रत्नागिरी : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुशोभीकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे लोकार्पण आज (दि. ९ ऑक्टोबर) सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्याच कार्यक्रमातून जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या अन्य रेल्वेस्थानकांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते. सुशोभीकरणानंतर रेल्वेस्थानके विमानतळांसारखी भव्य दिसत आहेत. स्थानकांमध्ये कोकण रेल्वेचे शिल्पकार मधू दंडवते यांची प्रतिमा लावण्यात आली असून, दर्शनी भागात व्हर्टिकल गार्डनही तयार करण्यात आले आहे. चित्रांनी भिंती सजवण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेशी चाकरमान्यांचे विशेष नाते आहे.
कोकणात पर्यटन वाढण्यासाठी पायाभूत सुविधा कशा वाढवता येतील, या दृष्टीने महायुती सरकार काम करत आहे. कोकणातून होणारे स्थलांतर थांबले पाहिजे, यासाठीही सरकारचे नियोजन तयार आहे, असे रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले. कोकण रेल्वेच्या एकूण ३२ रेल्वेस्थानकांचे टप्प्याटप्प्याने सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील १२ स्थानकांचा समावेश होता, असे चव्हाण यांनी सांगितले. रत्नागिरी हे राज्यातील सर्वांत सुंदर आणि सुसज्ज रेल्वेस्थानक होण्यासाठी भविष्यातील कामांकरिता एमआयडीसीने कोकण रेल्वेशी सामंजस्य करार करून ३८ कोटी रुपये दिले आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.
या कामाचे भूमिपूजन या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील साडेअकरा हजार रिक्षाचालकांच्या विम्यातील दोन हजार रुपये सिंधुरत्न योजनेतून भरण्याचा निर्णय घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. आंबा बागायतदारांना पिकअप व्हॅन्ससाठी सिंधुरत्न योजनेतून साह्य करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सामंत म्हणाले. सुशोभीकरणाच्या पुढच्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील निवसर, भोके आणि उक्षी या रेल्वेस्थानकांचा समावेश करण्याची विनंती सामंत यांनी यावेळी चव्हाण यांना केली.