रत्नागिरी – जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्याबाबत समन्वयातून तडजोडीने निकाली काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोक अदालतीत उच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे दाखल करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी व सचिव माणिकराव सातव यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी आपली प्रकरणे आपापसातील समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ही एक सुवर्णसंधी उच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पक्षकारांनी या रांधीचा लाभ घ्यावा व आपली प्रकरणे सामंजस्याने सोडवावीत. जलद तडजोड व विवादांचे निराकरण, विवादांचे किफायतशीर निराकरण, अंतिम आणि कार्यान्वित निर्णय, प्रकरणात लागलेल्या कोर्ट फीचा परतावा मिळू शकेल. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय परिसर येथे किंवा कार्यालयाच्या 8591903608 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.