काँग्रेसने दावा केलेल्या जागांवर ठाकरेंचे उमेदवार
सिंधुदुर्ग – काँग्रेस पक्षाने दावा केलेल्या जागांवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. आजवर जे कुणाचेच झाले नाहीत ते ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे होऊच शकत नाहीत अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथील प्रहार भवनमध्ये राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या यादीत असलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आपले एबी फॉर्म देऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. राज्यात अशा दहा जागा आहेत ज्या वर दिल्लीत काँग्रेस पक्ष श्रेष्ठी समोर चर्चा सुरू आहे. मात्र एकीकडे महाविकास आघाडीची पिपाणी वाजवायची आणि दुसरीकडे स्वतःच्या मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस ला भीक न घालता आपल्या पक्षाची उमेदवारी वाटण्याचे काम उबाठा च्या माध्यमातून सुरू आहे.
कोकणात तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला एकही जागा न देता भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटप मध्ये मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म वाटले जात आहेत. जे अर्ज उद्धव ठाकरे वाटत आहेत, त्यातील किती जागा काँग्रेसला द्यायचे ठरले होते हे काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणे जाहीर करावे. आज काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरेने भुईसपाट केले आहे. संपवून टाकले आहे. याचा काँग्रेसने विचार केला पाहिजे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात काँग्रेसला झुकते माप का नाही ? असा सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आदित्य ठाकरे उभा राहणार होता. त्याचे काय झाले ? आदित्य ठाकरे केवळ वडिलांसारखा सुक्या धमक्या देतो का? आतां कुठे गेले ते मांजर. २३ नोव्हेंबर नंतर वरळी मध्ये आदित्य ठाकरे आमदार नसणार.त्याच्या मागे माजी आमदार लागणार. बाळासाहेब ठाकरे असताना सगळे मोठे नेते मातोश्रीवर यायचे आता गेल्या पाच वर्षात तुमची 10 जनपथ ची मम्मी आणि राहूल गांधी मातोश्रीवर एकदा तरी आलाय का? त्याला मातोश्रीचा पत्ता तरी माहीत आहे का ? असा सवालआमदार नितेश राणे यांनी केला.