हिंगोलीत 1 कोटी 40 लाख रुपयांची रोकड जप्त

0

हिंगोली- हिंगोली शहरात पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना विधानसभा निवडणूक संबंधाने एका वाहनामधून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम असल्याची माहिती पोलीस विभागाला मिळाल्याने वाहन क्र. एमएच-38 एडी-6502 या वाहनाचे वाहन चालक अमित ओमप्रकाश हेडा (वय 43 वर्षे) रा.हिंगोली यांच्या वाहनाची पोलीस प्रशासनाने तपासणी केली असता या वाहनामध्ये 1 कोटी 26 लाख 88 हजार 520 रुपये आढळून आले आहे. ही रक्कम अमित ओमप्रकाश हेडा यांची रक्कम असल्याचे त्यांनी कबुली दिली आहे.

तसेच शहरात पोलीस पेट्रोलींक करीत असताना एका वाहनामधून मोठ्या प्रमाणात रक्कम जात असल्याचे पोलीस विभागाला माहिती मिळालेली असल्यामुळे वाहन क्र. एमएच-22 एएम-88 वाहनचालक गजानन माणिकराव काळे (वय 44 वर्षे) रा. सोडेगाव ता. कळमनुरी यांच्या वाहनाची तपासणी केली असता 13 लाख 50 हजार रुपयाची रक्कम आढळून आलेली आहे. सदर रक्कम गजानन माणिकराव काळे यांची असल्याची त्यांनी कबुली दिली असल्याचे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे.

सध्या 94-हिंगोली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता असल्याने व वाहनचालकांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने पोलीस विभागाने वरील दोन्ही प्रकरणाची एकूण रक्कम 1 कोटी 40 लाख 38 हजार 520 रुपये जप्त करुन निवडणूक विभागाच्या फिरते पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

94-हिंगोली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समितीचे नोडल अधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक प्रमुख व्ही. व्ही. चव्हाण, जे.बी.घुगे, कर्मचारी एस.डब्ल्यू. गुल्हाडे, डी.ए.डाखोरे, एस.डी. चिलकर, जी.के.इंगळे, आचारसंहिता पथकातील प्रतीक नाईक, राजेश पदमने, आशिष रणसिंगे इत्यादी कर्मचारी जप्त केलेली रक्कम कोषागार कार्याल्यात जमा करण्याची कार्यवाही करीत असल्याची माहिती 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech