मुंबई : महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाने आत्तापर्यंत ८० उमेदवारांची घोषणा केली असून काँग्रेसनेही उमेदवारांच्या ३ याद्या जाहीर केल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेदेखील उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने ६७ उमेदवारांची घोषणा केली होती. आता, तिस-या यादीतून उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाने परळी विधानसभा मतदार संघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देवून धनंजय मुंडे यांच्यासमोर तगडा उमेदवार देवून मैदान मारण्याची तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या लढती निश्चित होत असून राजकीय पक्षांकडून शेवटच्या उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. कारण, विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार २९ ऑक्टोबर पर्यंतच आहे. त्यामुळे, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यास वेळ मिळावा, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची राजी, नाराजी व बंडखोरी टाळली जावी, म्हणून पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे.