अहमदनगर : आदिवासी पारधी समाजाला मारहाण केल्याप्रकरणी ढाबा चालकावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचा राग मनात धरुन बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील ओहोळ यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणाची चौकशी करुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्या कॉन्स्टेबलवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.पक्षाच्या शिष्टमंडळाने नाशिक विभागीय पोलीस उपाधीक्षक ढिकले यांची भेट घेऊन निवेदन दिले.ढिकले यांनी सदर प्रकरणी चौकशी करुन कारवाईचे आश्वासन दिल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक विभाग) यांच्या कार्यालया समोर जारी करण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले.
याप्रसंगी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव,जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख,स्वप्निल पवार, विनायक काळे, निखिल काळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.सुनील ओहोळ हे आंबेडकरी चळवळीचे काम करत असून,ते बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी म्हणून कार्यरत आहे.उपेक्षित पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी ते पक्षाच्या माध्यमातून योगदान देत आहे.२९ सप्टेंबर रोजी आढळगाव (तालुका श्रीगोंदा) एका ढाब्यावर आदिवासी समाजातील तीन पुरुष व एक महिला जेवत होत्या.रात्री ११ वाजल्याने हॉटेल मालकाने वाद घालून आपल्या मुलगा व कामगारांसह आदिवासी समाजातील सदर व्यक्तींना बेदम मारहाण केली.मारहाण झाल्यानंतर सदर व्यक्ती श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांची फिर्याद घेण्यात आली नाही,रात्रभर त्यांना बसवून ठेवण्यात आले.त्यांच्यातील स्वप्निल पवार यांनी ओहोळ यांना संपर्क साधला.त्यानंतर ओहोळ या पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळण्या साठी पोलीस स्टेशनला धावून आले.यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी करुनही सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करणार नसल्याची ठाम भूमिका घेतली.
दरम्यान एका कॉन्स्टेबलने अर्वाच्य भाषेत आदिवासी समाजाच्या लोकांना पोलीस स्टेशन बाहेर हाकलून लावले.सुनील ओहोळ यांनी अप्पर पोलीस अधीक्षक खैरे यांना संपर्क साधून ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.तेव्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल करुन फिर्यादींना एका खोलीत कोंडण्यात आले.सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीसांना सांगून ढाब्याच्या मालकाला बोलावून घेतले.सदर ढाब्याच्या मालका ने सुनील ओहोळ यांच्याशी ओळख नसताना देखील खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवला.आदिवासी पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेणारे ओहळ यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे.ढाबा मालक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे घनिष्ठ संबंध असून,ढाबा मालकाला वाचवण्यासाठी ओहोळ यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.सदर प्रकरणी संपूर्ण चौकशी करुन,श्रीगोंदाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्या कॉन्स्टेबलवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.