सातारा – राजकारणाच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून अराम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी गेले होते. तिथे एक दिवस आराम करून परत मुंबईकडे निघताना अचानक त्यांचा ताफा त्यांच्याच गावातील काही महिलांनी थांबवला. यानंतर जे घडले त्याची कल्पना खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील केली नव्हती..
आपल्याच गावातील माय माऊल्यानी अचानक ताफा का थांबवला हे न कळल्याने मुख्यमंत्र्यांनीही आपल्या चालकाला तत्काळ गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबताच, या महिलांनी पुढे येऊन मुख्यमंत्र्यांना आपल्याला ओळखले का..? असे विचारले. यातील काही माता भगिनींचे आपल्या आईशी अत्यंत जिव्हाळ्याचे सबंध असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना चटकन ओळखले. तसे त्या महिलांनी पुढे येऊन मुख्यमंत्र्यांची आस्थेने विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी गाडीतून खाली उतरत त्यांच्या वयाचा मान राहून त्यांच्या पाया पडून त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या महिलांना तुम्हाला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे पैसे मिळाले की नाही ते विचारले. त्यावर या महिलांनी होकारार्थी मान हलवली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता या महिलांनी हातात औक्षणाचे ताट घेऊन भर रस्त्यात त्यांना मायेने ओवाळले. त्यानंतर आपल्या उबदार थरथरत्या हातानी मुख्यमंत्र्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तसेच राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार यायला हवे असेही बजावले.
या महिलांना रजा देऊन मुख्यमंत्री मुंबईला येण्यासाठी हेलिकॉप्टर मध्ये बसले. मात्र खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर भरकटल्याने पुन्हा दरे येथेच लँड करावे लागले. ज्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील या आणि अशा लाखो माता भगिनींचे लाडक्या बहिणीचे आशीर्वाद लाभले आहेत, त्यांच्यावर असे कितीही अवघड प्रसंग आले तरीही त्यांना काहीही होणार नाही. काल हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वी घडलेल्या घटनेमुळे याचीच खात्री पुन्हा नव्याने पटली.