सातारा जिल्ह्यात हत्तीरोगाचा कहर आठ तालुक्यांत तब्बल ४७ रुग्ण

0

कराड – सातारा जिल्ह्यात डेंग्यू पाठोपाठ आता हत्तीरोगाने कहर केला आहे. जिल्ह्यातील कराडसह ८ तालुक्यांमध्ये या रोगाचे तब्बल ४७ रुग्ण आढळून आले आहेत. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य व हिवताप विभागाने हत्तीरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.तसेच या रोगाची लागण झालेल्या रुग्णांचे रात्रीच्यावेळी रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. जिल्हा आरोग्य विभाग व हिवताप विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात हत्तीरोग बाधित रुग्णांची संख्या ४७ इतकी आहे. या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण’ कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग रुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सातारा,कोरेगाव, महाबळेश्वर,खंडाळा, कराड, फलटण, माण आणि खटाव तालुक्यांतील ५ हजार ९७५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १९ जूनपासून २ हजार १०० नमुने संकलित झाले आहेत. या संपूर्ण मोहिमेचे पर्यवेक्षण पुणे येथील हत्तीरोग सर्वेक्षण पथकाद्वारे केले जात आहे. शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील आठ तालुक्यात या मोहिमेंतर्गत १९ ते २६ जून या कालावधीत आठ तालुक्यांमधील ५ हजार ९७५ नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित केले जाणार आहेत.

ज्या व्यक्तीला हत्तीरोगाची लागण झाली आहे, त्या व्यक्तीच्या रक्तात ‘मायक्रो फायलेरिया’, हे जंतू आढळून येतात. रात्री झोपल्यानंतर रक्ताभिसरण प्रक्रिया सुरू होते. अशावेळी रक्ताचा नमुना घेतल्यास त्या व्यक्तीला हत्तीरोग झाला आहे की नाही, याचे निदान करता येते. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग व हिवताप विभागाकडून जिल्ह्यात रात्री ८ ते १२ या वेळेत रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech