अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अकोल्यात भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना मतदारसंघात पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे. आ. हरीश पिंपळे यांना उमेदवारी न देण्याची मागणी करण्यात आली आहे. मतदारसंघातील बार्शीटाकळी येथे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आ. पिंपळे यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच पक्षातील अंतर्गत वाद बाहेर येतांना दिसत आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात भाजप मधील अंतर्गत वाद उफाळुन आला आहे. मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आ. हरीश पिंपळे यांच्या विरोधात भाजपमधीलच काही पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आ. हरीश पिंपळे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे. आ. पिंपळे यांच्या विरोधात दुसरा नवीन उमेदवार देण्याची मागणी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे मूर्तिजापूरात आ. पिंपळे यांना निवडणुकीच्या आणि उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भाजपमधील विरोधाचा सामना करावा लागत आहे.
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार पक्ष नेतृत्वाने मूर्तिजापूर मतदारसंघात आ. हरीश पिंपळे यांना उमेदवारी न देता नवा उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे. आ. पिंपळे यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीमुळे, त्यांच्या अर्वाच्च बोलण्यामुळे, उर्मट वागण्यामुळे मतदार संघातील कार्यकर्त्याची त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदारांचा देखील त्यांच्यावर रोष आहे. त्यामुळे पिंपळे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये. त्यांच्या ठिकाणी दुसरा नवा आणि योग्य उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे मूर्तिजापूर मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. त्या संबंधितचे निवेदन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आले आहे.
मूर्तिजापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर हरीश पिंपळे हे आमदार म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडून आले. गेल्या तीन टर्मपासून हरीश पिंपळे हे मूर्तिजापूर मधून निवडून आले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मूर्तिजापूर मतदारसंघात भाजप आणि वंचितमध्ये काट्याची लढत झाली होती. ही लढत मतमोजणीच्या अखेरपर्यंत वादात राहिली. भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांनी अखेर निसटता विजय मिळविला होता.