दक्षिण-पश्चिम नागपुरातून दाखल केला उमेदवारी अर्ज
नागपूर – राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीचे सरकार येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. फडणवीस यांनी आज, शुक्रवारी नागपुरातील त्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या सोबत होते. देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. फडणवीस 1999 पासून आतापर्यंत एकही निवडणूक हरलेली नाही. महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीसयांनी व्यक्त केला आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते सकाळी 9.30 वाजेपासून नागपूरच्या आरबीआय चौकात एकत्रित आले होते.
देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने ‘रॅली’ सुरु झाली. एका ‘ओपन’ वाहनामध्ये उपमुख्यमंत्री, गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पूर्व नागपूरचे उमेदवार कृष्णा खोपडे, दक्षिण नागपूरचे उमेदवार मोहन मते, कृपाल तुमाने, शहराध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे उपस्थित होते.
ही ‘रॅली’ दुपारी 12.15 वजाताजिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. त्यानंतर निवडक पदाधिकारी व नेत्यांसह फडणवीस यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला. यावेळी नगरसेवक व पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, सलग सहाव्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानतो. मला सहाव्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली. मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की सभागृहाचा सदस्य म्हणून जनतेने माझे काम पाहिले आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे सरकार आहे तेच पुन्हा सत्तेवर येईल हा माझा विश्वास असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.