छोट्या बैठका आणि थेट संपर्कावर संघाचा फोकस

0

विधानसभा निवडणुकीसाठी स्वयंसेवक मैदानात

नागपूर – हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही उत्साह निर्माण झालाय. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीतही हरियाणाची पुनरावृत्ती करण्याचा संघाचा प्रयत्न आहे. त्यासाठी मोहल्ला बैठका, छोट्या गटांशी संवाद आणि मतदारांशी थेट संपर्क या 3 गोष्टींवर भर दिला जातोय. तसेच भाजपला पाठिंबा देणाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यावर संघाचा संपूर्ण भर आहे.

याबाबत संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही राज्यांतील मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी काही मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आला आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात संपूर्ण भर हिंदू एकतेवर आहे, तर झारखंडमध्ये अनेक आदिवासी भागात डेमोग्राफिक चेंज झाला आहे. यासाठी संघाने दोन्ही राज्यांमध्ये 4 ते 6 जणांचा गट तयार केला असून, ते नुक्कड सभा, छोट्या गट बैठका, ड्रॉईंगरूम मीटिंगच्या माध्यमातून संबंधित भागातील लोकांशी थेट संवाद साधत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे मते न मिळालेले बूथही संघाने ओळखले आहेत.लोकसभा निवडणुकीत समर्थक मतदार आणि कार्यकर्त्यांच्या उदासीनतेचा फटका भाजपला सहन करावा लागला. त्यामुळे संघाने कोणत्याही परिस्थितीत मतांची टक्केवारी वाढविण्याचा आग्रह धरला.

ज्या भागात भाजपचे मतदार कमी संख्येने होते ते क्षेत्र ओळखण्यात आले आहे. त्यासाठी 16 हजार नुक्कड सभा आणि 1.25 लाख लहान गट बैठका घेण्यात आल्या. हरियाणात हा प्रयोग केला असता त्याचा परिणाम असा झाला की लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत 3 टक्के मतदान वाढले. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपच्या मतदानात तफावत होऊन भाजपला त्याचा लाभ मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपची स्थिती सारखीच आहे. हरियाणात भाजपला काँग्रेसपेक्षा जवळपास 1 टक्के कमी मते मिळाली होती. तर महाराष्ट्रात मविआपेक्षा फक्त पॉईंट 16 टक्के कमी मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आहे जिथे भाजपचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 40 हजार नुक्कड सभा आणि 1.5 लाख लहान गट सभांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामाध्यमातून भाजप समर्थक मतदारांना बूथपर्यंत नेऊन मतदान करवण्याचा संघाचा प्रयत्न आहे.

यासोबतच झारखंडमध्ये 16 हजार नुक्कड सभा आणि 80 हजार लहान गट सभा घेण्याचे संघाचे लक्ष्य आहे. यातील बहुतांश सभा आदिवासीबहुल भागात होणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत या वर्गाच्या नाराजीमुळे पाचही राखीव जागांवर भाजपचा पराभव झाला होता.संघाचे म्हणणे आहे की, लोकसभा निवडणुकीत भाजपला विरोधी आघाडीपेक्षा 8 टक्के जास्त मते मिळाली, पण आदिवासी भागात ही आघाडी झाली नाही. राज्यातील अनेक आदिवासी भागात लोकसंख्येमध्ये बदल झाला आहे. अशा स्थितीत अशा भागात अधिकाधिक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकंदर हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी संघाने झारखंड आणि महाराष्ट्रात कंबर कसली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech