सणासुदीच्या काळात जादा तिकीट आकारणीवर आरटीओंचा असणार वॉच

0

अमरावती – सणासुदीत विशेषतः दिवाळीत प्रवाशांची संख्या वाढत असते. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सधारक तिकीटाची किंमत वाढवितात. मात्र, जादा तिकीट आकारणीवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाची करडी नजर राहणार आहे. जादा तिकीट आकारल्यास ट्रॅव्हल्स संचालकांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. अमरावती मधून पुणे, औरंगाबाद, मुंबई,नाशिक,इंदोर यासह विविध शहरांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने अनेकजण स्थायिक झाले आहेत तसेच अमरावती मध्ये सुद्धा परराज्यांतील व इतर शहरांतील नागरिक नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत.

बाहेरगावी असणारे सर्वच जण दिवाळीच्या सुट्यांमध्ये स्वगृही जाण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे रेल्वे आणि एसटी आरक्षण फुल्ल असल्यामुळे नागरिक ट्रॅव्हल्स बसने प्रवास करतात. खासगी प्रवासी बसला एस.टी. महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दीडपट भाडे आकारता येते. त्यापेक्षा जादा भाडेदर आकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु, अनेक ट्रॅव्हल्स संचालक अधिक नफा कमविण्याच्या अनुषंगाने अधिक दर आकारतात. मात्र, असे करणाऱ्यांवर आरटीओंच्या पथकांची नजर राहणार आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. तेथूनही वॉच ठेवला जाणार आहे.

प्रवाशांची होतेय लूटमार
अमरावती शहरातील मूळ रहिवासी दिवाळी सुटीनिमित्त परत येतात. यासाठी ते वाटेल ते प्रवासभाडे देत असतात. त्याचाच फायदा खासगी ट्रॅव्हल्सवाले घेत आहेत. प्रवाशांकडून नियमांपेक्षा जादा दराने आकारणी केली जाते. त्यामुळे शहर परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. सदर प्रकार थांबविण्यासाठी अमरावती प्रादेशिक परिवहन विभाग सज्ज झाला आहे. त्यांच्याकडून ट्रॅव्हल्सचालकांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech