आदिवासी नेते गणेश अंकुशराव आक्रमक, आपटे प्रशालेतील विद्यार्थ्यांसोबत आंदोलन
पंढरपूर : आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीपासून पंढरपूर मधील हजारो विद्यार्थी वंचित राहिल्याने आदिवासी नेते गणेश अंकुशराव हे आक्रमक झाले आहेत. आज (गुरूवार) त्यांनी आपटे प्रशालेतील आदिवासी महादेव कोळी जमातीच्या विद्यार्थ्यांसोबत आंदोलन केले. पहिली ते दहावी तील एकाच कुटुंबातील एकाला शिष्यवृत्ती मिळते परंतू त्याच्याच सख्ख्या भावाला मिळत नाही. याचा अर्थ आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्याचं महापाप शाळा प्रशासन, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते व शासनाचा आदिवासी विभाग करत आहे. जाणुनबुजून याकडे दुर्लक्ष करून आम्हा आदिवासींच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहेत. हा अन्याय आम्ही कदापिही सहन करणार नाही. आमच्या जातपडताळणी प्रमाणपत्राचा प्रश्न, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे स्मारकाचा प्रश्न सोडवला जात नाही आणि आता हा आमच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखण्याचा प्रयत्न होतोय, हे म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. तातडीने आदिवासी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्यास आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन यापेक्षा मोठं आंदोलन करू. असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.