नवी दिल्ली, 31 मार्च : शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या पक्षांत असणारे सर्व ठग आता भाजपात गेले आहेत. त्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आय.एन.डी.आय.ए.च्या वतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाओ महारॅली’निमित्त ठाकरे दिल्लीत आले होते. त्यापूर्वी त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते.
ठाकरे पुढे म्हणाले, देशातील सर्व भ्रष्टाचारी लोक भारतीय जनता पक्षात गेले आहेत. त्यामुळे तो पक्ष आता भ्रष्ट जनता पार्टी झाला आहे. इतकेच नव्हे तर ते आम्हाला ठग म्हणतात, पण देशात जेवढे ठग आहेत त्या सर्वांचेच भाजपमध्ये स्वागत झाले आहे. परिवारवादी राजकारणाच्या आरोपांना उत्तर देताना ठाकरे म्हणाले, भाजपवाल्यांना कुटुंबाचा अर्थ समजत नाही. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागेल. आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही अजेंडा नाही. इलेक्टोरल बाँडचा मुद्दा समोर आल्यापासून लोकांना भाजपचा खरा चेहरा म्हणजेच ‘भ्रष्ट जनता पार्टी’चा कळला आहे. हा पक्ष भ्रष्टाचाऱ्यांचा आहे. यातील सगळे भ्रष्ट लोक आहेत. भ्रष्ट लोकच भाजपमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे ते ‘भ्रष्ट जनता पार्टी’ झाले आहेत, असे ते म्हणाले.
अरविंद केजरीवाल मागे एकदा मला मुंबईत भेटले. तेव्हा ते भाजप विरोधात ठाम होते. इतकेच नव्हे तर भाजपच्या हुकुमशाही विरोधात लढण्यासाठी नेमके काय करावे लागेल याबाबत ते बोलत होते. भाजपचे हे तत्व आहे. आपल्यासमोर विरोधकच राहिला नाही पाहिजे. जे विरोधात जातील त्यांना खोट्या प्रकरणात अडकावायचे, केंद्रीय यंत्रणांना हाताला धरुन अटक करायची. चुकीच्या कारवाया करायच्या. अगदीच ते जमले नाही तर मग विरोधकांची प्रतिमा मलीन करायची. त्यांच्या कुटुंबीयांचे प्रतिमाहनन करायचे. पण, आम्ही भाजपला घाबरत नाही. आम्ही ठरवले आहे. भाजप विरोधातील लढाई जनतेच्या न्यायालयात जाऊन लढायची, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.
…तर फडणवीसांनी मणिपूर फाईलसारखा चित्रपट काढावा
दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर, लडाखला जावं मी खर्च करतो…त्यांनी काश्मिरी पंडितांना भेटावं…एखादा प्रोड्युसर घेऊन मणिपूर फाईलसारखा चित्रपट काढावा असा खोचक सल्लाही ठाकरेंनी दिला. कालच फडणवीसांनी राहुल गांधी जर सावरकर सिनेमा पाहणार असतील, तर माझ्या खर्चाने पूर्ण थिएटर बुक करायला तयार आहे असं म्हटलं होतं. त्यावर ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.
देशात हुकूमशाही येईल अशी भिती नाही, तर हुकूमशाही आल्यातच जमा आहे, अशी टीकाही ठाकरेंनी केली.