मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मिळत आहे. आता विजय वैद्य हे आपल्यात नाहीत. त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची रक्कम यापुढे त्यांच्या पत्नी वैशाली विजय वैद्य यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. त्याचप्रमाणे वैद्य यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष म्हणून केलेली हॅट्ट्रिक, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून केलेली हॅट्ट्रिक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे उभारलेले समाजसेवेचे प्रचंड मोठे कार्य, त्यांचे वाचक आणि ग्रंथालय चळवळीतील मोठे योगदान लक्षात घेऊन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने विजय वैद्य यांच्या नांवाने एखादा पुरस्कार सुरु करावा, अशी सूचना वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत करण्यात आली. मंत्रालयातील पत्रकार कक्षात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री प्रमोद डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली विजय वैद्य यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी एक्स्प्रेस चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार रमेश कीर यांनी विजय वैद्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या शोकसभेस प्रारंभ झाला. अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, सरचिटणीस प्रवीण पुरो, वैभव विजय वैद्य, राजन पारकर, खंडूराज गायकवाड, योगेश त्रिवेदी, नितीन सावंत, सदानंद खोपकर, अभय देशपांडे, महेश पावसकर, गिरीश वसंत त्रिवेदी, प्रवीण राऊत, अनंत नलावडे, आदींनी आपल्या भावना व्यक्त करीत विजय वैद्य यांच्या गौरवपूर्ण कार्याला उजाळा दिला.