नवी दिल्ली : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज, गुरूवारी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी झारखंडचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नुकत्याच झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सोरेन यांच्या नेतृत्त्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाखालील आघाडीला 81 पैकी 56 जागा मिळाल्या. तर ‘एनडीए’ आघाडीला फक्त 24 जागांवर समाधान मानावे लागले. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनलेत. झारखंडच्या इतिहासात चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे सोरेन हे पहिले राजकीय नेते ठरले आहेत.
हेमंत सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आज अभिनंदन केले. परंतप्रधानांनी सोशल मिडीयावर सोरेन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रांची शहरातील मारोबाडी मैदानावर आयोजित या शपथविधी सोहळ्याला इंडि आघाडीचे सर्व नेते प्रामुख्याने उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून हेमंत सोरेन यांचे अभिनंदन करत सोरेन यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.