नवी दिल्ली – कोलकाता येथे महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती जेबी पराडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठात प.बंगाल प्रशिक्षणार्थी डॉक्टर अत्याचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (20 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीशांना पाठवलेल्या या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती.
9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलीस दहाच्या सुमारास घटनास्थळी आले. पीडितेच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. सुरुवातीला रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी याला आत्महत्या असल्याचे म्हटले होते, परंतु नंतर पोस्टमॉर्टम अहवालात बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले. यानंतर कोलकाता पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी संजय राय याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हा मान्य केला. पुढे हे प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत सुमारे 20 जणांची चौकशी केली आहे. सीबीआय पथकाने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये आणि बाहेर 3D लेझर मॅपिंगची तपासणी केली आहे. दरम्यान, पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी देशभरातील विविध भागात निदर्शने होत आहेत. प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टवर पाशवी अत्याचाराच्या घटनेने देशातील राजकारण तापले आहे. तसेच, देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी याविरोधात आंदोलन करत आहेत.