श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी आज, बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान एनसीसोबत निवडणूक लढवणारी काँग्रेस सत्तेत सहभागी झालेली नाही. त्याऐवजी काँग्रेस जम्मा-काश्मीर सरकारला बाहेरून पाठिंबा देणार आहे. या सोहळ्याला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी व इंडी आघाडीचे काही नेते उपस्थित होते.
राज्यातून कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला यश मिळाले. केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर ओमर अब्दुल्ला हे जम्मू- काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे मुख्यमंत्रीपदी ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. एनसी आणि काँग्रेसने एकत्रपणे विधानसभा निवडणूक लढवली होती. पण काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झालेले नाही. काँग्रेसने नवीन सरकारमध्ये एका मंत्रिपदाची ऑफर नाकारली आहे.
त्याऐवजी बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.शपथविधी सोहळ्याआधीओमर अब्दुल्ला म्हणाले की, आम्हाला खूप काही करायचे आहे. आमचे सरकार जम्मू- काश्मीरमधील लोकांच्या तक्रारी जाणून घेईल. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात नव्हत्या. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करणे ही आमची जबाबदारी असेल अशी ग्वाही अब्दुल्ला यांनी दिली.राज्यात नॅशनल कॉन्फरन्सने 90 पैकी 42 जागा जिंकल्या. तर काँग्रेसला 6 जागा मिळाल्या. आम आदमी पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या एका आमदाराने आणि 5 अपक्षांनी ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला पाठिंबा दिला आहे.