प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येचे प्रकरण
कोलकाता – पश्चिम बंगालच्या कोलकाता येथीलसरकारी रुग्णालयातील (आरजी कार मेडिकल कॉलेज) पीजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी संजय रॉय नामक आरोपीला अटक केलीय. त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचा मृतदेह शुक्रवारी सापडला होता. तिची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
तरुणीचे डोळे, तोंड आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता. तसेच पोटावर, डाव्या पायाला, मानेला, उजव्या हाताला, ओठांना जखमा आहेत. तसेच शवविच्छेदनात तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे सिद्ध झालेय. या घटनेनंतर वैद्यकीय विद्यार्थी, भाजप, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली.
पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान हे प्रकरण जलदगती न्यायालयात पाठवले जाईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार आहे. सीबीआय तपासाला हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी संजय रॉय नावाच्या व्यक्तीलाही अटक केली आहे. तसेच घटनेच्या रात्री मुलीसोबत रुग्णालयात उपस्थित असलेल्या 5 जणांची चौकशी करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मुरली धर यांनी सांगितलेकी, भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 103 (1) आणि 64 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बलात्कार आणि खून प्रकरण आहे. आम्ही पारदर्शक पद्धतीने तपास करत आहोत असे पोलिसांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थी डॉक्टर चेस्ट मेडिसिन विभागाची पीजी विद्यार्थिनी होती. गुरुवारी 8 ऑगस्टच्या रात्री ड्युटी करत होती. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.