नवी दिल्ली – भारतीय संसदेची नवी ईमारत वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बनल्याचा दावा आसामच्या जमीयत उलेमा-ए-हिंदचे मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केलाय. मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी घोषणा केली की, जमीयत उलेमा ए हिंद आसाममधील वक्फ बोर्डाच्या जमिनींचे सर्वेक्षण करेल जेणेकरून या विधेयकाला आव्हान देता येईल. नवीन संसदेची इमारत ही वक्फच्या जमिनीवर बनली आहे. वक्फ जमिनीची यादी पाहा, त्यात संसदेचाही उल्लेख आहे. वसंत विहारपासून एअरपोर्ट ते दिल्ली एअरपोर्टही वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बनले आहे. हा जुना रेकॉर्ड आहे. दक्षिण भारतात चंद्राबाबू नायडू यांच्या राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हायकोर्ट उभारले आहे. त्याला कुणी परवानगी दिली नाही असे त्यांनी सांगितले.
तसेच वक्फच्या जमिनीवर कुणी काहीही करत आहे. ते अडचणीत येऊ शकतात. सरकार येत जात राहील. वक्फ बोर्डाच्या वादामुळे केंद्रातील सरकार जाईल, आमच्याकडे जुना भारताचा रिपोर्ट आहे, त्यात संसद वक्फ बोर्डाच्या जमिनीवर आहे हे असेल. मी 15 वर्ष संसदेत होतो, संसदेची जमीन वक्फच्या जागेवर आहे अशी चर्चा होती, त्यामुळे यावर संशोधन व्हायला हवे, आम्हीही संशोधन करू. अनेक वर्ष चर्चा होती, परंतु त्यावर संशोधनाची गरज पडली नाही. आता वक्फ विधेयक आल्यामुळे याचे संशोधन करण्याची गरज आहे. संसदेपासून आसामपर्यंत वक्फच्या जितक्या जागा आहेत त्या मुस्लिमांना मिळायला हव्यात अशी मागणी मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केली.