नवी दिल्ली: देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबईतील मतदारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर नियोजनाअभावी लांब रांगा लागल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अनेक मतदार कंटाळून घरी निघून गेले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर बरीच टीकाही झाली होती.
या प्रकाराची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने मुंबई महानगरपालिकेला महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता मुंबईतील मतदान केंद्रांवर नागरिकांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. गेल्यावेळी मुंबईतून अनेक तक्रारी आल्या होत्या. आम्ही नुकताच झारखंड आणि महाराष्ट्राचा दौरा केला होता. यावेळी आम्ही दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय व्यवस्थेचा आढावा घेतला होता.
गेल्यावेळी मुंबईत मतदारांना अनेक ठिकाणी अडचणी आल्या होत्या. हा प्रकार लक्षात घेता आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना यावेळी कठोर निर्देश दिले आहेत. पालिका आयुक्तांना आम्ही सर्व यंत्रणा मतदानासाठी वापरण्याचे आदेश दिले आहेत. गेल्यावेळचा अनुभव लक्षात घेता आम्ही मतदान केंद्रांवर थोड्या थोड्या अंतरावर खुर्ची आणि बेंच ठेवण्यास सांगितले आहे. जेणेकरुन मतदान केंद्रांवर रांग लागल्यास रांगेतील वृद्ध व्यक्तींना बसता येईल. मुंबईतील सर्व निवडणूक केंद्रांवर ही व्यवस्था असेल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.