नवी दिल्ली – संसदेत केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयकावर स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार कल्याण बॅनर्जींनी रागाच्या भरात टेबलवर काचेची बाटली फोडल्याची घटना घडणी. भाजपच्या अभिजीत गंगोपाध्याय यांच्याशी वाद झाल्यानंतर बॅनर्जींनी हा धिंगाणा घातला. दरम्यान त्यांना एक दिवसासाठी समितीतून निलंबित करण्यात आले आहे. संयुक्त संसदीय समितीच्या आज, मंगळवारी झालेल्या बैठकीत बॅनर्जी यांनी भाजपा खासदाराशी जोदार भांडण केले. त्यानंतर टेबलवर काचेची बॉटल फोडली. यावेळी बॅनर्जींच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांना एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी आणि आपचे संजय सिंह उपचारासाठी घेऊन गेलेत.
भाजपा खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंगळवारी सेवानिवृत्त न्यायाधीश आणि वकिलांच्या एका गटाशी चर्चा करत होती. त्यावेळी या विधेयकाशी यांचे काय देणे घेणे असा आक्षेप विरोधी खासदारांनी घेतला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये वाद सुरू झाला. संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत भाजपा खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद झाला. ज्यात रागाच्या भरात कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या टेबलाजवळ ठेवलेली काचेची पाण्याची बाटली जोरात आपटली. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. जेपीसीच्या आजच्या बैठकीत कायदेशीर बाजू मांडणारे काही मंडळी आली होती. त्यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी मला काही विचारायचं आहे असं म्हटलं तेव्हा अध्यक्षांनी तुम्ही याआधी खूप बोललात. आता नाही त्यानंतर खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यातील वादात हा प्रकार घडला.