हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे रस्त्याच्या शेजारी असलेल्या स्टॉलवरील मोमोज खाल्ल्याने 15 जण आजारी पडले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंजारा हिल्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नंदीनगरमध्ये रस्त्यावरील स्टॉलवर मोमोज खाल्ल्याने एका 31 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रेश्मा बेगम असे या महिलेचे नाव असून त्या नंदीनगर येथील रहिवासी आहेत. याशिवाय याच स्टॉलवर मोमोज खाल्ल्याने आणखी 15 जण आजारी पडले. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली की, मोमोज खाल्ल्याने ती आजारी पडली आणि नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पुढील कारवाईबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
रेश्मा बेगम आणि इतरांनी रविवारी 27 ऑक्टोबर रोजी ‘दिल्ली मोमोज’ नावाच्या फूड स्टॉलवरून मोमोज खाल्ले होते. चिंतल बस्ती येथे हा स्टॉल जवळपास 3 महिन्यांपूर्वी बिहारहून आलेल्या अरमान आणि त्याच्या 5 मित्रांनी सुरू केला होता. याप्रकरणी पोलिसांनी मोमोज स्टॉल लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महिलेच्या मृत्यूचे कारण आणि तिच्या आजारांचा तपास केला जात आहे.