उल्हासनगर – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी विविध पथके कार्यरत असून, त्याअंतर्गत कार्यरत भरारी पथक क्र. 06 ने दि.31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे 2 वाजता मोठी कारवाई केली. कल्याणकडून मुरबाडकडे वाहन क्र. MH 05 DZ 9911 हे जात असताना संशयास्पद वाटल्याने या वाहनाची तपासणी केली. त्यावेळी त्या वाहनात रु.17 लाख रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले. संबंधित वाहनचालकाची विचारणा केली असता, त्यांनी कोणताही ठोस पुरावा दिला नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करुन ती कोषागारात भरणा करण्यात आली व याबाबत आयकर विभागाला कळविले असून या प्रकरणी सखोल तपासणी सुरु आहे, अशी माहिती 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कल्याणी मोहिते यांनी दिली आहे.