मुंबई – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खारमधील घरातून नोकराने २ लाख रुपये लंपास केल्याचे उघड झाले असून याप्रकरणी नोकर अर्जुन मुखिया यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे घेऊन तो त्याच्या मुळगावी बिहारला पळाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
राणा यांचा खार येथील लाव्ही अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावर राणा यांच्या मालकीचे घर आहे. या घरात अर्जुन घरगडी म्हणून काम करत होता. गेल्या १० महिन्यांपासून तो याच घरावर राहात होता. रवी राणा यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या संदीप ससे यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात २ लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी कपाटात ठेवली होती. खर्चासाठी काही रक्कम काढण्यासाठी कपाट उघडले होते. यावेळी कपाटात २ लाख रुपये नव्हते. संपूर्ण कपाटाची पाहणी करुनही त्यांना कुठेच पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर त्यांनी घरात शोधाशोध केली असता रक्कम चोरीला गेली, घरगडी म्हणून काम करणारा अर्जुन देखील गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर संदीप ससे यांनी खार पोलिसात नोकर अर्जुन मुखिया याच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी अर्जुन विरोधात गुन्हा दाखल केला. ससे यांच्यावर या घराची जबाबदारी आहे. नोकर अर्जुन मुखिया हा मूळचा बिहारच्या दरभंगाचा रहिवाशी आहे. मार्च महिन्यांत तो होळीनिमित्त त्याच्या गावी गेला. त्यानंतर तो परत आला नाही. सस यांनी अर्जुनला अनेकदा कॉल केला होता. मात्र त्याने कॉल घेतला नाही.