नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या ताज्या निकालांनी तब्बल २८० नव्या चेहर्यांना संसदेत प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये चित्रपट अभिनेत्यांसोबतच माजी मुख्यमंत्री, माजी न्यायाधीश यांच्यासह काही राज्यसभा खासदारांचाही समावेश आहे.
लोकसभेत सर्वाधिक म्हणजे ८० खासदार पाठविणार्या उत्तर प्रदेशातून ४५ नवे चेहरे निवडून आले आहेत. त्यामध्ये रामायण मालिकेचे अभिनेता अरुण गोविल यांचा समावेश आहे. अरुण गोविल यांनी मेरठमधून विजय मिळवला होता.
तर अमेठीमध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांचा पराभव करणारे काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा आणि नगिना मतदारसंघातून विजय मिळविणारे आझाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद हे देखील पहिल्यांदा निवडून आले आहेत. महाराष्ट्रातून भाजपचे राज्यसभेतील सभागृह नेते व माजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे देखील पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत.
त्यांच्यासोबतच राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात कनिष्ठ सभागृहामध्ये पहिल्यांदा प्रवेश करणार्या खासदारांमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई, भाजपचे भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया आणि पुरूषोत्तम रुपाला या राज्यसभा खासदारांचाही समावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत (हरिद्वार), हरियानाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (करनाल), त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लवकुमार देव (त्रिपुरा पश्चिम), बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी (गया), कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (हावेरी),तसेच जगदीश शेट्टर (बेळगाव), पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (जालंधर) या आठ माजी मुख्यमंत्र्यांना देखील लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आहे.
तर, रुपेरी पडद्यावरील दोन कलाकार देखील यंदा पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये मल्याळम सिने अभिनेते आणि केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे सुरेश गोपी तसेच अभिनेत्री कंगना राणावत (मंडी, हिमाचल प्रदेश) यांचा समावेश आहे.
सर्वाधिक राजकीय उलथापालथ घडलेल्या महाराष्ट्रामध्ये देखील बर्याच नव्या चेहर्यांना संसदेत जाण्याची संधी या निवडणुकीत मिळाली आहे. यामध्ये दिंडोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदार संघातून विजयी झालेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे भास्कर भगरे यांचा समावेश आहे, त्यांनी भाजप नेत्या व मंत्री भारती पवार यांचा पराभव केला होता.
यासोबतच, अमरावतीचे बळवंत वानखडे, भाजप नेते व माजी मंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांनी अकोल्यातून विजय मिळवला. सांगलीतून अपक्ष उभे राहून विजय मिळविणारे विशाल पाटील, कोल्हापूरच्या राजघराण्याचे छत्रपती शाहू महाराज यांचाही समावेश संसदेत प्रवेश करणार्या नव्या चेहर्यांमध्ये आहे.