मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीला ५ पालकमंत्र्यांची दांडी…!

0

 

मुंबई- राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळ आढावा बैठक घेतली पण या बैठकीला ५ पालकमंत्री गैरहजर होते यातूनच सरकार दुष्काळावर गंभीर नाही हे स्पष्ट दिसते. मुख्यमंत्र्यांनी जागेवरच आदेश द्यायला पाहिजे होते पण केवळ बैठकीचा सोपस्कार पूर्ण केला. सरकारने आचार संहितेचे बहाणे करुन टाळाटाळ करू नये, तातडीने जनावरांना चारा, पिण्याचे पाणी व लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यातील सरकार हे असंवैधानिक आहे, या सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीही देणेघेणे नाही. गरीब लोकांचे जीव जात आहेत पण त्याकडे सरकारचे लक्ष नाही. दुष्काळाने जनता होरपळत आहे पण सरकार काहीही उपाययोजना करत नाही. पुण्यात धनदांडग्याच्या मुलाने गरिबाच्या दोघांना चिरडले तर निबंध लिहून त्याला सोडून दिले. डोंबिवलीत रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन ११ लोकांचा मृत्यू झाला व ६० जण जखमी झाले. डोंबवलीत यापूर्वी झालेल्या एका घटनेनंतर महाविकास आघाडी सरकारने हे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते पण त्यानंतर आलेल्या महाभ्रष्ट युती सरकारने पैसे घेऊन ते कारखाने सुरुच ठेवले. लोकांच्या जिविताचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे पण खोके सरकारला गरिबांच्या जीवाचे मोल नाही, जनाची नाही मनाची असेल तर शिंदे-भाजपा सरकारने राजीनामा देऊन मोकळे व्हावे, असे नाना पटोले म्हणाले.

नवीन अभ्यासक्रमासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, अभ्यासक्रमात जर मनुस्मृतीचा समावेश केला तर ते अजिबात चालणार नाही, काँग्रेस ते कदापी खपवून घेणार नाही. सर्व तपासून यासंदर्भात पुढची पाऊले उचलू, असे नाना पटोले म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech