मुंबई : चौथ्या टप्प्यातील निवडणूक जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर पाचवा टप्पा पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू आहे. तिसरा टप्पा संपल्याने आता बडे नेते या मतदारसंघांचा दौरा करणार असून, पुढील आठवड्यात बड्या नेत्यांचा प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. १२ ते १५ मे दरम्यान या मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या तोफा धडाडणार आहेत. या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांची राळ उडणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर लढत देत आहेत. ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून प्रचाराचा जोर लावला जाणार आहे. तीच स्थिती शेजारच्या भिवंडी मतदारसंघात आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांच्यात थेट लढत होत आहे. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाची नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बंडखोर नेत्याचे आव्हान असणार आहे. तरीही येथे सर्वच पक्षांनी मित्रपक्षांच्या मदतीने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या दोन्ही मतदारसंघांत चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बड्या नेत्यांचे दौरे सुरू होणार आहेत.
येत्या १२ मे, १३ मे आणि १५ मे रोजी दोन्ही लोकसभा मतदारसंघांत दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीत येणार असून उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या सभा होणार आहेत. महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत आहेत. कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे १२ मे रोजी डोंबिवलीत जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकतात.
दरम्यान, भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे कपिल पाटील यांच्याविरुध्द राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे, निलेश सांबरे यांच्या बरोबर लढत होणार आहे. हा गड सहजासहजी राखणे भाजपला यावेळी जड जात असल्याने अखरेच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी येत्या १५ तारखेला कल्याण पश्चिमेत सभा घेणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय घमासान पहायला मिळणार आहे.