भाविकांच्या निवा-यासाठी पंढरीत नवा मंडप

0

पंढरपूर – आषाढी वारीला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी आस लावून बसलेल्या भक्तांची सोय व्हावी आणि सुविधा मिळाव्यात, यासाठी मंदिर व्यवस्थापन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, विठ्ठल मंदिरात भाविकांच्या निवा-यासाठी नवा मंडप उभारण्यात येत आहे. मंदिरातील बाजीराव पडसाळी येथे हा मंडप उभारण्यात येणार आहे. अत्याधुनिक पद्धतीने या मंडपाची उभारणी करण्यात येत असून, त्यासाठी हलक्या वजनाचे लोखंड व पत्र्यांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात थांबायला चांगली जागा उपलब्ध होणार आहे.

आषाढी वारी असो की इतर वेळा पंढरीत सातत्याने भक्तांचा ओघ सुरू असतो. त्यातच आषाढी वारीत तर भक्तांचा महापूर पाहायला मिळतो. अशावेळी विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर देवाच्या दारात क्षणभर विसावा घ्यावा आणि आपला आनंद व्यक्त करावा, यासाठी मंदिरात एक नवीन मंडप मंदिरातील बाजीराव पडसाळी येथे उभारण्यात येत आहे. सध्या मंदिराच्या संवर्धनाचे जे ७३ कोटीचे काम सुरू आहे, त्यामध्येच मंडपाचे काम सुरू आहे. अत्याधुनिक पद्धतीने हलक्या वजनाचे लोखंड व पत्र्यांचा वापर करून या मंडपाची उभारणी केली जात आहे. याची उंची मंदिराच्या आकाराला साजेशी ठेवल्याने या ठिकाणी भाविकांना ऊन आणि पावसाचा कोणताही त्रास जाणवणार नाही, असे सांगण्यात आले.
मंदिरातील या मंडपामुळे विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाविकांना विश्रांती घेता येणार आहे. मंदिरातील महालक्ष्मी मंदिराशेजारी असणा-या या बाजीराव पडसाळी या परिसरात पूर्वी सिमेंट काँक्रिटचा स्लॅब होता. या वजनाने मंदिराला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मंदिराचे दगड निसटायला सुरुवात झाली होती. मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू झाले तेव्हा सिमेंटची सर्वच बांधकामे पाडून टाकण्यात आली. आता या ठिकाणी अत्यंत आकर्षक आणि भक्तांना आल्हाद, आनंददायी वाटावा, असा मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कामामुळे भाविकांना आता थोडावेळ मंदिरात थांबायला एक चांगली जागा उपलब्ध होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech