श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते चरार-ए-शरीफ मतदारसंघातील आमदार अब्दुल रहीम राथेर यांची सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे पहिले अध्यक्षपद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला आहे. जम्मू आणि काश्मीरची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना झाल्यानंतर 6 वर्षांहून अधिक कालावधीनंतर विधानसभेचे अधिवेशन होत आहे. कृषी मंत्री जावेद अहमद दार यांनी अध्यक्षपदासाठी रादर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार रामबन अर्जुनसिंग राजू यांनी 5 दिवसांच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.त्यांच्या निवडीनंतर, राथेर यांना सभागृह नेते ओमर अब्दुल्ला आणि विरोधी पक्षनेते, भाजपचे सुनील शर्मा यांनी अध्यक्षस्थानी नेले. राथेर यांनी यापूर्वी जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभेत अध्यक्षपद भूषवले होते. पीडीपी-काँग्रेस आघाडीचे सरकार असताना 2002 ते 2008 या काळात राथेर विरोधी पक्षाचे नेते होते.