अमरावती – एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका करताना केलेल्या एका विधानाने सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. नवनीत राणांना भाजपने उमेदवारी दिली. त्याबद्दल बोलताना अडसूळांनी राणा यांची कोर्टातील केस मॅनेज केली गेली, असा दावा केला आहे. नक्की काय म्हणाले अडसूळ? प्रचारानिमित्ताने आनंदराव अडसूळ शेगावला होते. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आनंदराव अडसूळ यांनी काही मुद्द्यांवर भूमिका मांडली. महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाही. त्याचबरोबर देशातही चारशे पार अशक्य आहे, असेही ते म्हणाले.
अडसूळ म्हणाले, ‘प्रचाराच्या निमित्ताने आलोय. काल मी हिंगोलीला होतो, दोन सभा केल्या. परवा रामटेकला होता. आता तशी काही अडचण दिसत नाही. वातावरण चांगलं आहे. आणि आम्ही कितीही म्हटलं की, महायुतीला 45 च्या वर जागा मिळतील. परंतू 35 च्या दरम्यान मिळायला हरकत नाही, असं मला आजघडीला वाटतंय. देशामध्ये 400 पार शक्यता कमी आहे, पण ३०० पार नक्कीच मिळतील.’
नवनीत राणांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आनंदराव अडसूळ म्हणाले की, ‘त्या पती-पत्नीला खरंच अक्कल आहे की नाही, हा माझ्यापुढे प्रश्न आहे. नैतिकता नाहीच आहे. अक्कलहीन आहे. आटापिटा करून या मंडळींनी (भाजपने) मला थांबवलं आणि तिला उमेदवारी दिली. न्यायालयाची केसही मॅनेज केली. असं असताना हवा नाही. हवा नाही. मग गेली कशाला तिथे? राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबरच थांबवायला हवं होतं’, अशी टीका आनंदराव अडसूळ यांनी केली.
‘हा अडाणीपणा आहे. कृतघ्नपणा आहे. हिची हवा आहे. १७ रुपयांच्या साड्या वाटून हवा निर्माण झाली. नवरा बायकोला बंटी आणि बबली ही नावं दिली आहेत ना, ती लोकांनी विचारपूर्वक दिली आहेत’, अशी टीकाही अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर केली. ‘मी सगळ्यांना सांगून ठेवलं आहे. त्यांनी असं जाहीर केलं होतं की, हे बाप बेटे माझ्या प्रचाराला येतील. त्यावेळी सांगितलं की, राजकारण सोडेन पण प्रचाराला येणार नाही. ज्या पद्धतीने तिथे उमेदवारी दिली. मला दिली नाही, हे सोडून द्या. पण, ज्या पद्धतीने दिली. ज्या पद्धतीने हा न्यायालयाचा निकाल आलेला आहे, अशा स्थिती जाऊन मी आणखी शिक्का मारू का की हे केलं ते बरोबर आहे म्हणून’, असा सवाल उपस्थित करत राणांच्या प्रचाराला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.