मुंबई- वांद्रे पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. शनिवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी त्यांनी काढलेल्या महायुतीच्या भव्य रथयात्रेला वांद्रेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वांद्रे पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्र. १०१ मधून महायुतीच्या रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी वांद्रेकरांनी ठिकठिकाणी जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केले. या रथयात्रेत तरुणांपासून, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले. “वांद्रेवासीयांचा हा विश्वास, त्यांचे हे प्रेम आणि पाठिंबा पाहून खरेच भारावून गेलो. गेल्या १० वर्षांत केलेल्या जनसेवेच्या कामांची ही पोचपावती आहे”, अशी प्रतिक्रिया आ. आशिष शेलार यांनी दिली.
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नित्यानंद नगर आणि राहुल नगरमधील नागरिकांनी शनिवारी आ. आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यांच्या प्रलंबित समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याची ग्वाही आ. शेलार यांनी दिली. शुक्रवारी वॉर्ड क्रमांक ९९ येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. वांद्र्यात विजय महायुतीचाच, असा निर्धार त्यांनी यावेळी केला.