मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणींकडून मिळाली अनामत रक्कमेची भेट
कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लाडक्या बहिणींनी पुढाकार घेतल्याची अनोखी घटना आज ठाण्यात घडली. या बहिणींनी आपल्या क्षमतेनुसार पैसे जमा करून मुख्यमंत्री शिंदे यांनाच अनोखी भाऊबीज दिली. लाडक्या बहिणींकडून अचानक मिळालेली ही भेट पाहून खुद्द मुख्यमंत्री शिंदेंही आश्चर्यचकित झाले.
मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेच्या वतीने कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने ठाणे शहरातील तमाम शिवसैनिकांनी एकत्र येऊन भव्य शक्तिप्रदर्शन केले. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्ज भरण्यासाठी निघाले. वाटेत जय महाराष्ट्र नगर, किसन नगरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी त्यांचे भव्य स्वागत केले. लाडक्या बहिणींनी जागोजागी चौकाचौकात औक्षण करून त्यांना ओवाळले, तर अनेकांनी आपल्या राहत्या घरातून फुलांचा वर्षाव करत त्याना अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रत्येक ठिकाणी थांबून या प्रेमाचा स्वीकार केला. यावेळी अनेकांनी त्याना पुन्हा आपणच मुख्यमंत्री व्हावे आशा शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात तब्बल सहा तास मिरवणूक काढून मतदारसंघातील आबालवृद्धांशी भेटीगाठी घेतल्या.
या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे तसेच महायुतीतील इतर नेत्यांनी सहभागी होत मुख्यमंत्र्यांसाठी प्रचार केला. किसन नगर येथील आयटीआय येथील कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, धर्मवीर अध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले आदी उपस्थित होते. तर शिंदे कुटूंबातील मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, सून सौ. वृषाली शिंदे, नातू रुद्रांश तसेच ठाणे जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मिरवणुकी, दरम्यान किसन नगर नंबर 2 येथे आले असता दर्शना जानकर यांच्या साईदर्शना फाउंडेशनशी संलग्न असलेल्या १७० बचत गटातील महिलांच्या वतीने पुढे येत मुख्यमंत्र्यांच्या हातात एक पैशांनी भरलेले पाकीट ठेवले. मुख्यमंत्र्यांना स्वतः काही वेळ हे नक्की काय आहे ते कळले नाही मात्र त्यानंतर ज्या भाऊरायाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणून आम्हा महिलांना दिवाळीची ओवाळणी दिली त्या भावाला त्याचा फॉर्मची अनामत रक्कम भरण्यासाठी सर्व महिला भगिनींनी जमतील तसे पैसे एकत्र करून ही भाऊबीज दिल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या लाडक्या भावाच्या पाठीशी आम्हीही तितक्याच खंबीरपणे उभ्या आहोत हे सिद्ध करण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार स्वखुशीने जमेल तशी ही रक्कम जमा केली असल्याचे त्यांनी सांगितले. लाडक्या बहिणींनी व्यक्त केलेले हे प्रेम पाहून मुख्यमंत्री शिंदे हेदेखील काही क्षण स्तब्ध झाले. यानंतर त्यांनी या बहिणींनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावे यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून कुणीही कितीही प्रयत्न केले तरीही ही योजना बंद होऊ देणार नाही असे सांगितले. उलट तुम्ही अशाच पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्यात तर या रक्कमेमध्ये नक्की वाढ करू असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना जाहीर केले. तसेच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत नक्की विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांना संत एकनाथ महाराजांच्या वंशजाचे शुभाशीर्वाद
मुख्यमंत्र्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी येऊन शुभाशीर्वाद दिले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आपण प्रचंड मताधिक्याने विजयी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.