मुंबई – राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित लोकसभा मतदारसंघातून अखेर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. भाजपच्या या घोषणेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा या मतदारसंघावरील दावा संपुष्टात आला आहे. नारायण राणे हे आता महायुतीचे उमेदवार म्हणून उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी भाजपचे राज्यातील प्रमुख नेते तसेच शिवसेनेचे व राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाची ही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जातो की भाजप हा मतदारसंघ लढवते याकडे राज्याचे लक्ष लागून राहिलेले होते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. तथापि भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वे मध्ये जर ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने लढवली असती तर तेथे महायुतीचा पराभव होण्याची भीती होती आणि त्यामुळेच भाजपने अखेरीस माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने समोरील आव्हान अधिक प्रबळ करून ठेवले आहे.
त्यामुळे आता कोकणामध्ये नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे असा जंगी सामना लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रंगलेला पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे यापूर्वी दोन वेळा खासदार राहिलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत हे यावेळी महाआघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे विनायक राऊत हे कोकणातून पुन्हा बाजी मारतात की नारायण राणे यापूर्वीची त्यांची पराभवाची मालिका खंडित करतात याकडे आता अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.