(अनंत नलावडे,)
मुंबई -भाजप हा भ्रमिष्ट लोकांचा पक्ष असून त्यांचे कार्यकर्ते पगारी नोकर आहेत, अशा परखड शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना टीका केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला असून आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याला भाजपकडून विरोध केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरममधील रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमने-सामने आले. या घटनेवर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हे झेंडे फडकवणारी लोकं भाजपचे सर्व पेड वर्कर आहेत, असा थेट आरोपही खा.राऊत यांनी केला.
खा. राऊत म्हणाले,भाजपकडे सध्या काही काम नाही. भाजप पक्ष हा एक भ्रमिष्ट पक्ष आहे. या राज्यात त्यांचे सरकार आल्यापासून महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ झाली आहे.बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात २७ ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. सरकारला याबाबत प्रश्न विचारले की मग भाजपचे कार्यकर्ते बनावट प्रकरणे निर्माण करतात. म्हणजेच ते भाजपचे कार्यकर्ते नसून पगारी नोकर आहेत.भाजप आयटी सेल, झेंडे फडकवणारी लोक हे सर्व पेड वर्कर आहेत,असाही आरोप खा.राऊत यांनी केला.
राऊत पुढे म्हणाले, भाजपचे हे लोक महाविकास आघाडीबद्दल ज्या भूमिका घेत आहेत, त्या बनावट आणि खोटारड्या भूमिका आहेत. त्यांच्या सरकारमध्ये किमान दोन मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर थेट महिला अत्याचाराचे आरोप आहेत. अत्याचारामुळे त्या महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला होता. आता मात्र ते नेते भाजपच्या मंत्रिमंडळात बसले आहेत. त्यामुळे आधी देवेंद्र फडणवीसांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी. त्यानंतरच भाजपने नैतिकतेच्या ढोंगी गप्पा माराव्यात, अशी प्रखर टीकाही त्यांनी यावेळी केली.
………………………………..(समाप्त)…………..