(अनंत नलावडे)
मुंबई – २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत ज्या मतदारांची नावे यादीत होती. ती २०२४ च्या निवडणूकीत गहाळ कशी झाली ? का झाली ? कुणाच्या आदेशानी झाली ? या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करीत आज भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष व आ.ॲड आशिष शेलार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आपण स्वतः, खासदार धोत्रे, हेमंत वणगा आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा समावेश होता, अशी माहिती देत सुमारे एक तास ही बैठक झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जे मतदान नोंदणी अभिमान सध्या सुरु आहे त्यातील त्रुटी आणि काही महत्त्वाचे मुद्देही या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या यावेळी निदर्शनास आणून दिले.तसेच अभियानामध्ये नव्याने नोंदणी करताना मतदाराचे फोटो, पत्ता तसेच नाव यामध्ये येणाऱ्या काही तांत्रिक अडचणी सुध्दा शिष्टमंडळाने लक्षात आणून दिल्या, असे सांगत यावेळी या अभियानाचा लेखाजोखाही मांडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
या भेटीसंदर्भात सविस्तर माहिती देताना ॲड. शेलार म्हणाले की, मुंबईतील जवळजवळ ११०० गृहनिर्माण सोसायटीमध्ये बुथ निर्मितीच्या कामाने गती घेतली असून २५ जुलै पर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असला तरी त्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा अशी विनंती आम्ही केली. त्यानुसार आयोगाने ७ दिवस मतदार नोंदणी अभियानात वाढ करण्याची तयारी दर्शवली आहे.त्यामुळे अंतिम यादी जाहीर करण्याची मुदतही सात दिवस पुढे ढकलण्यात आली असून
आता २ आँगस्ट पर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. त्याचा मतदारांना फायदा होईल, असा विश्वासही अँड. शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी शिष्टमंडळाने प्रमुख मागणी करताना आयोगाचे एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आले. ते असे की,२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी मतदान केले होते,अशा मतदारांची नावे २०२४ च्या निवडणुकीत गहाळ झाल्याचे उघड झाले होते.त्यामुळे मतदारांना मतदान करता आले नाही.कारण महाराष्ट्रात अशा मतदारांची संख्या मोठी होती.ही नावे का गायब झाली? कशी गायब झाली? कुणाच्या आदेशाने गायब झाली?या प्रकरणीही सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करीत या सर्व मतदारांना पुन्हा यादीत सामावून घेण्यासाठी काय करता येईल याबाबत आयोगाने लक्ष द्यावे अशी विनंतीही या शिष्टमंडळाने केली.त्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद आयोगाने दिल्याची माहितीही अँड.शेलार यांनी यावेळी दिली.त्याचवेळी मतदारांनी आपले नाव यादीमध्ये बिनचूक कसे नोंदले जाईल,ओळखपत्र,फोटो बिनचूक कसे येतील याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
…………………….