भंडारा – लोकसभेला जनतेने महाविकास आघाडीला ६५ टक्के जागा दिल्या. ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. आता त्यापेक्षाही जास्त जागा विधानसभेला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. महायुतीत कोण राहील किंवा कोण जाईल हे मला माहिती नाही, पण महायुतीला १०० जागाही मिळणार नाहीत. गेली १० वर्षे चालत आलेले भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी, महागाईवर नियंत्रण, बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र तसेच राज्य सरकार अपयशी ठरल्यानेच लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजनेत अडकले असल्याची राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
पूर्व विदर्भातील मतदारांनी भाजपाचा दणदणीत पराभव केला. राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते बनवण्याची कामगिरी केली आहे त्याबद्दल गोंदियाकरांचे धन्यवाद, या विधानसभेच्या निवडणुकीतही नेत्रदीपक कामगिरी होईल याबद्दल मला काही चिंता नाही. भंडारा-गोंदिया परिसरात नानाभाऊंचे काम हलके झाले. ते राज्यभरात फिरू शकतात आणि या दोन्ही जिल्ह्यांत गोपाल अग्रवाल हे मविआच्या आणि काँग्रेसच्या सर्व जागा जिंकून आणतील ही जबाबदारी त्यांची राहील. मी मुख्यमंत्री असताना गोपाल अग्रवाल यांच्यासोबत काम केले आहे. २४ तास गोंदिया मतदारसंघाचा विकास करण्याचा ध्यास, मग विधिमंडळाच्या भाषणातून, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून, मंत्र्यांकडून कामे करून घेण्याची इतकी चिकाटी मी कधी पाहिली नाही. ते लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते, तिथेही चांगली कामगिरी केली असे त्यांनी सांगितले.दरम्यान, पुढच्या काळात अनेकजण काँग्रेसमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत.
दररोज एक-एक नवीन कार्यक्रम होणार आहे. भाजपाचे खरे रूप पाहिलेले आता तिथे राहणार नाहीत. आज काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आल्यापासून त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवचैतन्य भरलेले आहे. नाना पटेल यांना संपूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद देऊन काँग्रेसमध्ये स्फूर्ती आणली आहे. गोंदिया येथील सभेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, निवडणूक झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार सत्तेतून बाहेर पडतील आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या १३ महिन्यांच्या सरकारची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक प्रश्न आहेत, निवडणुकीत बेरोजगारी, महागाई, शेतक-यांच्या आत्महत्या, संविधान बचाव हे सगळे मुद्दे एकच आहेत. यातील एकही मुद्दा केंद्र सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकारला सोडवता आलेला नाही म्हणूनच महाराष्ट्रातल्या तीन तिघाडी काम बिघाडी सरकारमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.