‘चहाच्या टपरीवर असताना दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर’

0

मुंबई – उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात केलेल्या बंडाच्या आठवणी सांगताना एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विधानभवनात मतदान सुरू असताना मी सूरत निघालो. वसईत एका चहाच्या टपरीजवळ उभा होतो, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, पण मी ती नाकारली, असे शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाईम्स ऑफ इंडिया इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असा आरोप करते की, उद्धव ठाकरे हे रुग्णालयात असताना महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी तुम्ही कट रचला? असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘हा कट नव्हता, तर उठाव होता. विधान भवनामध्ये राज्यसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना ही योजना तयार केली. सगळ्या आमदारांना सांगितलं की, संजय राऊतांना मतदान करा आणि मी सूरतसाठी निघालो.’ शिंदेंनी उत्तर देताना पुढे सांगितलं की, ‘आम्ही संजय राऊतांना पराभूत करू शकत होतो, पण आम्ही तसे केले नाही. सूरतला जाईपर्यंत मला उद्धव ठाकरे यांचे कॉल आले. वसईतील एका चहाच्या टपरीवर असताना मी उद्धव ठाकरेंशी फोनवरून बोललो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. पण, आता खूप उशीर झाला आहे, असे मी त्यांना सांगितलं.’ शिंदे पुढे असं ,सांगितले की, ‘मी हे जाहीरपणे सांगितलं आहे. इतकंच नाही, तर त्यांनी (उद्धव ठाकरे) भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनाही कॉल केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की, ते शिवसेनेसोबत युती करू शकतात, मग एकनाथ शिंदेंसोबत का जात आहेत? पण, तोपर्यंत त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नव्हतं.’

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech