सोलापूर- समाजातील जे घटक भाजपा विरोधी आहेत त्यांच्या घरा पर्यंत जाऊन पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यासाठी काय केले आहे हे त्यांना समजावून सांगितले पाहिजे, तरच त्यांचा गैरसमज निघणार आहे.ओबीसी ना 1992 साली आरक्षण मिळाले, त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. आरक्षणाच्या यादीत मराठा समाजाला का घातले नाही? मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण आरक्षणाबाबत एकाने ही प्रयत्न केला नाही, शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिले. भाजपा घटना बदलणार असा अपप्रचार केला जात आहे, परंतु घटना बदलता येत आहे त्यात वेळोवेळी प्रसंगा नुसार दुरुस्ती करता येते. देशाच्या भवितव्यासाठी सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना निवडून द्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
लोकसभेचे उमेदवार आमदार सातपुते यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे पेनुर ता मोहोळ येथे आयोजन केले होते त्यावेळी पालकमंत्री पाटील मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे होते.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, मराठ्यांना ओबीसी म्हणण्या पूर्वीच त्यांच्या विद्यार्थ्यांची कोट्यावधीची फी शासनाने भरली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधित पाच ठिकाणे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. त्याला निधीही उपलब्ध झाला आहे. मुस्लिम समाजाचा गैरसमज काढला पाहिजे. पंतप्रधानांनी गॅस व धान्य मोफत दिले आहे, आजारावरील उपचारासाठी पाच लाखाची सुविधा ही मोफत दिली आहे. येत्या एक जून पासून आता मुलींना शिक्षण ही मोफत दिले जाणार आहे. 22 पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे आमदार सातपुते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.