बारामती – बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.दोन्ही उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात दाखवलेल्या खर्चात तफावत आढळून आली आहे.त्यामुळे दोन्ही उमेदवारांना दोन दिवसांत खुलासा करावा, असे निर्देशदेखील निवडणूक आयोगाने दिले आहे.
सुप्रिया सुळे यांनी २८ एप्रिलपर्यंत ३७ लाख २३ हजार ६१० रुपये खर्च केले. तर सुनेत्रा पवार यांनी २८ एप्रिलपर्यंत २९ लाख ९३ हजार ३१ रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे. सुप्रिया सुळे यांच्या खर्चात १ लाख ३ हजार रुपयांची तर सुनेत्रा पवार यांच्या खर्चात ९ लाख १० हजारांची तफावत आढळून आली आहे.यामुळे दोन्ही उमेदवारांनी ४८ तासांत खुलासा करावा,असे निर्देश दिले आहेत. अन्यथा उमेदवारांच्या खर्चात तफावत समाविष्ट केली जाईल,असेही नोटीशीत म्हटले आहे.