हमीरपूर – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 400 पार जागा मिळतील. तर काँग्रेसला 40 हून कमी जागांवर समाधान मानावे लागेल असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ते हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर मतदारसंघात अनुराग ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी शाह म्हणाले की, इंडी आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी उमेदवारच नाही. एका पत्रकाराने त्यांना (इंडिया आघाडी) विचारले तुमचा पंतप्रधान कोण होणार..? तर त्यांनी उत्तर दिले की, प्रत्येक एका वर्षासाठी एक व्यक्ती होईल. असे कुठे सरकार चालते का? असा सवाल करत 140 कोटी लोकसंख्येचा देश चालवणे सोपे काम नसल्याचे शाह यांनी सांगितले. या निवडणुकीत एकीकडे राहुल बाबा आहेत, जे दर 6 महिन्यांनी सुट्टी साजरी करतात आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत, ज्यांनी 23 वर्षांपासून सुट्टीच घेतलेली नाही. तसेच मोदी दिवाळी देखील सीमेवर लष्कराच्या जवानांसोबत साजरी करतात. देशातील जनतेसमोर दोन्ही प्रकारची उदाहरणे आहेत, असे अमित शाह म्हणाले. तसेच, अयोध्येतील राम मंदिर आणि पाकिस्तानजवळील अणुबॉम्बबाबतच्या वक्तव्यावरून अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राहुल आणि त्यांची बहीण सुट्ट्यांसाठी शिमल्यात येतात, पण रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला हजर राहिले नाहीत. हे लोक अयोध्येतील राम मंदिरात जात नाहीत, कारण त्यांना त्यांच्या व्होटबँकेची भीती वाटते, असा टोला अमित शाह यांनी लगावला.
अमित शाह यांनीही पीओकेबाबत काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेते आम्हाला पीओकेबद्दल बोलू नका म्हणून घाबरवतात. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. आज मी देवभूमीला सांगतो, आम्ही भाजपावाले अणुबॉम्बला घाबरत नाही. मी हे स्पष्टपणे सांगतो – पीओके भारताचा आहे, राहील आणि आम्ही तो घेऊ असे शाह म्हणाले. तसेच, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 40 च्या खाली जाईल. तर एनडीए 400 पार करत असल्याचा दावाही अमित शाह यांनी केला. याशिवाय, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे कौतुक करताना अमित शाह म्हणाले की, त्यांनी केवळ त्यांच्या क्षेत्राचीच काळजी घेतली नाही तर देशभरातील तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले. तेव्हा ठाकूर यांना विजयी करण्याचे आवाहन शाह यांनी केले.