मुंबई – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ असा नारा दिला, त्याच आधारावर राहुल गांधी यांनी आयर्न लेडी इंदिरा गांधींच्या नावाने राजकारणात महिला सशक्तीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. इंदिरा गांधी फेलोशिपअंतर्गत महिला सशक्तीकरणासाठी ‘शक्ती अभियान’ सुरु करण्यात आले असून महाराष्ट्रात या अभियानाची सुरुवात आजपासून सुरु होत आहे, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
टिळक भवन येथे ‘शक्ती अभियानाचा’ शुभारंभ केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, एक वर्षापूर्वी सुरु केलेल्या शक्ती अभियानाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रदेश काँग्रेस हे अभियान मोठ्या ताकदीने राबवणार आहे. या अभियानात महाराष्ट्रातील आयेशा खान, अनुष्का वानखडे, रोहिणी धोत्रे, विजया दुर्धवळे, मीना धोदडे यांनी सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली आहे. हे अभियान जिल्हा, तालुका, ब्लॉक स्तरावर राबवले जाणार आहे. महिला नेतृत्व पुढे आले पाहिजे यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने काँग्रेसने महिला आरक्षण विधेयक आणले त्यावेळी याच भाजपाने त्याला विरोध केला होता पण मोदी सरकारने ते विधेयक पुन्हा आणले असता काँग्रेसने मात्र त्याला पाठिंबा दिला. पण मोदी सरकारने फक्त विधेयक मंजूर केले आरक्षणाची अंमलबाजवणी केली नाही कधी करणार ते ही सांगितले नाही काँग्रेस पक्ष मात्र सरकार आल्याबरोबर महिला आरक्षणाची अंमलबजावणी करेल.