सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद आणखी वाढली आहे. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदेना पाठिंबा जाहीर केला. सोलापुरात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात थेट लढत होणार होती. मात्र वंचित आणि एमआयएम यांनी देखील सोलापुरात उमेदवार जाहीर केला. त्यामुळे प्रणिती शिदेंच्या उमेदवारीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता थेट माकपने शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे.
काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आडम यांची माकप कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. यावेळी नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदेना जाहीर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. नरसय्या यांनी सांगितले की, ‘गेल्या १० वर्षात भारताला योग्य गती नाही, विकासाची योग्य दृष्टी नाही, राजकीय ईच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यामुळे माकप राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर करत आहे.’ दरम्यान, नरसय्या आडम हे प्रणिती शिंदेंचे कट्टर विरोधक मानले जातात. प्रणिती शिंदे यांनी २००९, २०१४, २०१९ च्या निवडणुकीत आडम यांचा पराभव केला. त्यामुळे प्रणिती शिंदे आणि नरसय्या आडम हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. मात्र आता आडम यांनी काँग्रेसची साथ द्यायचा निर्णय घेतल्याने प्रणिती शिंदे यांची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत मागील अनेक वर्ष एकमेकांचे विरोधक राहिलेले प्रणिती शिंदे आणि आडम आगामी लोकसभा निवडणुकीत एकमेकांची साथ देणार आहेत.