मुंबई : जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या अॅपवर चिन्हांकित करणे आवश्यक आहे. या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे होऊ शकेल.
दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९८,११४ मतदान केंद्रे आहेत. त्यांपैकी ९८,०३९ मतदान केंद्रांवर रॅम्पची आवश्यकता आहे. त्यांतील ९७,६६२ मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ३७७ मतदान केंद्रावर प्रमाणित मानकानुसार तात्पुरत्या रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना सुलभपणे वापरता येतील अशी शौचालयेही उभारली आहेत.
विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३१३ मतदान केंद्रांवर सर्व दिव्यांग मतदान अधिकारी कार्यरत असणार आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि समाजमाध्यमे ह्या वरील मजकूर दिव्यांग नागरिकांना, विशेषतः अंध आणि कर्णबधिर मतदारांना वाचण्या-ऐकण्यायोग्य तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आधीच मतदार असलेल्या दिव्यांग मतदारांनी Saksham-ECI या अॅपवर आपले नाव कसे चिन्हांकित करावे, नव्याने मतदार नोंदणी कशी करावी, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सुविधा इ. माहिती व्हिडिओ व लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे.