मुंबई – ”लाडकी खुर्ची” वाचवण्यासाठी लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना राज्यात राबविण्यता येत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘तिजोरीत नाही आणा, तरी मला बाजीराव म्हणा’ अशी या सरकारची दुर्गती झाली आहे”, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली आहे. पुढे बोलतांना राऊत म्हणाले राज्याची आर्थिक घडी महायुतीमुळे बिघडली असून सरकारच्या तिजोरीत खडपूही शिल्लक नाही. त्यामुळे कंत्राटदारांना या कामांची बिले मिळतील तरी कशी?” असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
“सरकारच्या उत्पन्नातील बहुतांश रक्कम या कर्जाचे व्याज फेडण्यात जात असल्याने तिजोरीत काही शिल्लकच उरत नाही, अशी अवस्था आहे. तरीही राज्याची आर्थिक घडी उद्ध्वस्त झाल्याचे हे वास्तव लपवून मिंध्यांचे सरकार निवडणुकीच्या तेंडावर रोज नवनव्या फुकटछाप घोषणांचा पाऊस पाडत सुटले आहे. “विकासकामांवर खर्च करण्यासाठी सरकारकडे छदामही उरला नाही. तिजोरीत खडखडाट झाल्याने राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या विकासकामांची तब्बल 36 हजार कोटी रुपयांची बिले थकली आहेत. सरकार दिवाळखोरीत निघाल्याचाच हा पुरावा आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
राज्याची आर्थिक शिस्त संपूर्णपणे कोलमडली. आर्थिक शिस्तीचे पालन करणारे राज्य ही महाराष्ट्राची ओळख मिटवून टाकण्याचा विडाच राज्यातील मिंध्यांच्या सरकारने उचललेला दिसतो आहे. केवळ विडाच उचलला असे नव्हे तर राज्याची अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन आर्थिक शिस्तीचे राज्य ही ओळख पुसून टाकण्यात मिंध्यांची राजवट दुर्दैवाने यशस्वी झाली आहे. ऋण काढून सण साजरे करण्याच्या अनिष्ट वृत्तीमुळे राज्याची आर्थिक शिस्त संपूर्णपणे कोलमडली व सरकार पुरते कंगाल झाले. आता तर परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की, विकासकामांवर खर्च करण्यासाठी सरकारकडे छदामही उरला नाही. महाराष्ट्राच्या डोक्यावरील कर्ज या सरकारने 8 लाख कोटींवर नेऊन ठेवले. ‘तिजोरीत नाही आणा, तरी मला बाजीराव म्हणा’ अशी या सरकारची दुर्गती झाली आहे, असेही संजय राऊत म्हणाले.