ठाणे – निवडणूक काळात पैसा आणि दारुंचा धुरळा उडत असतो, अनेकदा गावागावात कार्यकर्त्यांच्या पार्ट्यांची मैफील जमत असते. मात्र, निवडणूक काळात पोलिस यंत्रणाही अतिशय सतर्क असते. त्यामुळेच, अवैध दारुवाहतूक असेल, अमली पदार्थांची वाहतूक असेल किंवा बेहिशोबी मालमत्ता असेल, पोलिसांची करडी नजर असते. पोलिसांकडून कसोशीने तपासयंत्रणा राबविण्यात येते. मात्र, तरीही गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येतात. आता, कल्याण क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका किराणा दुकानातून तब्बल साडे चार कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या घटनेने अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
उल्हासनगर शहरातील हिल लाईन पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका किराणा दुकानातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार कोटी रुपयांच्या किमतीचे ड्रग्स जप्त केले असून ड्रग्स डीलर दुकानदारालाही अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेमागील मास्टरमाईंड मुख्य ड्रग्स डीलर अद्यापही फरार आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली.
अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील गायत्री किराणा दुकानांमध्ये मोफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला खब-याकडून समजली. त्यानंतर, कल्याण क्राईम ब्रँचने तत्काळ या किराणा दुकानात धाड टाकत ३ किलो एमडी जप्त केले, या एमडी ड्रग्जची किंमत ४ कोटी ५२ लाख २९ हजार रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, कल्याण क्राईम पोलिसांनी आरोपी दुकानदार राजेश कुमार प्रेमचंद तिवारी याला बेड्या ठोकले आहेत. तर, मुख्य आरोपी शैलेंद्र राकेश अहिरवार हा फरार झाला असून पोलिस याचा शोध घेत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसह उपगनगरातील अंमली पदार्थांच्या घटनांमुळे तरुणाई कोणत्या दिशेला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, विशेषत: एमडी मोफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले जात आहे.