अवामी इत्तेहादचे इंजिनीअर रशिद यांचा आरोप
श्रीनगर – नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हातमिळवणी केल्याचा दावा अवामी इत्तेहाद पक्षाचे अध्यक्ष इंजिनिअर रशीद यांनी केलाय. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नॅशनल कॉन्फरन्सला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाले असून आज, बुधवारी ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर घणाघाती आरोप करताना इंजिनिअर रशीद म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याबाबत फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींशी हातमिळवणी केली होती. हे पाऊल उचलण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अब्दुल्ला कुटुंबाशी सल्लामसलत केल्याचाही दावा राशिद यांनी केला आहे. काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्सला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपने मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ओमर अब्दुल्ला राज्याचा दर्जा, कलम 370 आणि 35-अ बद्दल बोलतात. तर ओमर अब्दुल्ला 370 पासून लांब पळून जात आहेत. जेव्हा पंतप्रधान मोदींनी कलम 370 हटवले तेव्हा त्यांनी फारुख अब्दुल्ला यांची 3 दिवसांआधी भेट घेतली होती. या बैठकीनंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले होते की, काहीही हटवले जाणार नाही. मात्र कलम 370 काढून टाकण्यात आले आणि फारूख आणि ओमर अब्दुल्ला यांना गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी सल्लामसलत करून कलम 370 हटवले. हे सर्व मॅच फिक्सिंग होते. भाजपने नॅशनल कॉन्फरन्सला सत्तेत येण्यास मदत केली यात शंका नसल्याचा आरोप इंजिनियर रशीद यांनी केला.
इंजिनियर रशीद यांना दहशतवाद्यांचे समर्थन केल्याच्या आरोपाखाली श्रीनगरमधील स्पेशल ऑपरेशन ग्रुपने अटक केली आणि तीन महिने नजरकैदेत ठेवले होते. त्यांच्यावर देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप असून त्यांना कार्गो, हम्मामा आणि राजबाग तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर श्रीनगरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप रद्द केले. मात्र ऑगस्ट 2019 मध्ये, रशीद यांना पुन्हा युएपीए अंतर्गत अटक करण्यात आली. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केले होते. तुरुंगात असताना २०२४ च्या संसदीय निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीत त्यांनी ओमर अब्दुल्ला यांचा पराभव करून विजय मिळवला.