मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल करा….!

0

प्रदेश काँग्रेसची मागणी…..

मुंबई – अनंत नलावडे

कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली असून यासंदर्भात सोमवारी कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दाखल करण्यात आली.

वस्तुतः १३ सप्टेंबरला बेंगलूरूच्या टाऊन हॉल परिसरात कोणतीही परवानगी न घेता विश्व हिंदू परिषदेने आंदोलन आयोजित केले होते.यावेळी आंदोलकच गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते.त्यामुळे आंदोलकांना ताब्यात घेताना केवळ मूर्तीला इजा होऊ नये म्हणून पोलिसांनी मूर्ती सुरक्षित ठेवली व आंदोलकांना ताब्यात घेतले.मात्र त्यानंतर पोलिसांनीच विधिवत पूजा अर्चना करून गणपतीबप्पाचे विसर्जन केले.ही माहिती अनेक फॅक्ट चेक करणा-या वेबसाईट्स व राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी फॅक्ट चेकच्या माध्यमातून सार्वजनिक केली.

मात्र केवळ राजकीय फायद्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना कर्नाटक सरकारने व पोलिसांनी गणपती उत्सव थांबवून गणपतीची मूर्ती जप्त केली असे धडधडीत असत्य विधान करून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.त्यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या एक्स (ट्वीटर) हँडलवरून या संदर्भात चुकीची माहिती प्रसारित करून कर्नाटकच्या काँग्रेसलाच जबाबदार धरले.तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात खोटी माहिती प्रसारित करून समाजात तेढ आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा व सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई अशी मागणी करणारी लेखी तक्रार आज प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष ॲड.रविप्रकाश जाधव यांनी कुलाबा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाकडे केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांकडून सातत्याने फेक न्यूज आणि अफवा पसरवून राज्यात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांचे हे कृत्य सामाजिक शांतता भंग करणारे आहे. पोलिसांनीही यांची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशीही आग्रही मागणी काँग्रेस पक्षाने केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech