मुंबई – जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच, जागतिक नेत्यांचाही भारता विषयीचा विश्वास वाढल्यामुळे भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा स्पष्ट झाली असून जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे, यापेक्षा अन्य पुराव्याची गरज नाही. जेथे राज्य, केंद्र सरकार एकत्र काम करतात, तेथे उद्योगांची सहाजिकच पहिली पसंती असते. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीस सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक उद्योगांची भावना असल्यामुळे विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी काढले . मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जयशंकर बोलत होते. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार, सरचिटणीस संजय उपाध्याय यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या परराष्ट्रमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्या प्रास्ताविकात आपली भूमिका स्पष्ट केली. जयशंकर यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी समर्पितपणे व वेगवान काम सुरू असून त्यासाठी महाराष्ट्राचा विकास वेगवान असायलाच हवा. स्वातंत्र्यानंतर उद्योग, तंत्रज्ञान, विमानतळ, रेल्वे वाहतूक, बुद्धिमत्ता, भौगोलिक सुविधा यांमध्ये महाराष्ट्र कायम आघाडीवर राहिला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात झालेले काम महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार सर्वसमान्यांपर्यंत पोहोचवत आहे. गेल्या काही महिन्यांत विदेशी गुंतवणूक, उत्पादन, निर्यातवाढ, यांबाबत सरकारने मोठे निर्णय घेतले असून त्यामुळे देशातील गुंतवणूक, पायाभूत सुविधांचा विकास, बंदरांचा विकास तसेच रेल्वे, रस्ते वाहतुकीच्या सुविधा बळकट झाल्या आहेत.
कौशल्य, शिक्षण, प्रशिक्षण यांच्या आधारे तरुण पिढीला रोजगारक्षम बनविण्यावर भर दिला जात असल्यामुळे आता केवळ देशातच नव्हे, तर ‘ग्लोबल वर्कप्लेस’ म्हणजे, अनेक अन्य देशांतही आमचे रोजगारक्षम तरूण नोकऱ्या मिळवू लागले आहेत. पंतप्रधान मोदी स्वतः काही आठवड्यांपूर्वी सिंगापूरच्या जी-7 संमेलनात सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिकेसारख्या देशांच्या दौऱ्यात त्यांनी तेथील उद्योगपती, कंपन्यांसोबत चर्चा केली. आता रोजगार, गुंतवणूक, उत्पादन या क्षेत्रांत देशाने भक्कमपणे पाय रोवले असून यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केली जात आहे. शेजारी राष्ट्रांतील घटनांबाबतही आपण योग्य प्रकारे सतर्क असून जगातील तणावपूर्ण परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांची भूमिका महत्वाची ठरत आहे, याकडेही परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी लक्ष वेधले.
गेल्या दशकभरात देशाच्या सीमाभागात मोठे परिवर्तन झाले असून सीमेवर कुंपण बांधण्यात प्रगती झाल्याने पूर्वी एवढी घुसखोरी आता होत नाही, असा दावाही त्यांनी केला. मध्यंतरीच्या बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे सीमेपलीकडून काही प्रयत्न झाले, पण कारवाई करावी लागली. मोदी सरकार देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी जरूर प्रयत्न करत राहील. जेथे कुंपण घालणे गरजेचे आहे, तेथे कुंपणही घातले जाईल, असे त्यांनी निःसंदिग्धपणे स्पष्ट केले. बांगलादेश, म्यानम्यारमधून काहीजण शरणार्थी बनून घुसखोरी करू पाहत असल्याचे स्पष्ट झाल्याने सीमासुरक्षेचा फेरआढावा घेतला जात असून आम्ही सीमाभाग मोकळा राहू देणार नाही. कोणीही कसेही घुसावे ही 2014 पूर्वीची स्थिती आता राहिलेली नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
केंद्र आणि राज्य सरकारांची औद्योगिक नीती वेगळी असते, हे खरे आहे. यामध्ये समन्वय असावा याकरिता डबल इंजिन सरकार गरजेचे असते, असे ते म्हणाले. भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या राज्यांत 12 विभाग जाहीर करण्यात आले आहेत. त्यांचे स्थान, आकार, वैशिष्ट्ये वेगळी आहेत, त्यामुळे राज्यांनी त्याबाबतचे धोरण निश्चित करावे, अशी अपेक्षाही एस. जयशंकर यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारांची भागीदारी सकारात्मक असावी, त्यावरच या योजनेचे यश अवलंबून आहे, असे ते म्हणाले. गुंतवणुक आकृष्ट करण्यासाठी राज्यांनी स्पर्धा करावी, ती देशहिताचीच असते. पण महाराष्ट्र हे सर्वाधिक उद्योगप्रधान राज्य असून उद्योगांची महाराष्ट्रास पसंती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील बंदरे ही सर्वाधिक जागतिक सुविधायुक्त आहेत. रस्ते, रेल्वेचे जाळे आहे, महाराष्ट्राला महत्वाची भौगोलिक अनुकूलता आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आदर्श राज्य आहे. जर्मनीतील अनेक उद्योगांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे. सरकारची इच्छाशक्ती, गुणवत्ता, प्रतिसादात्मकता यांवर अखेर अवलंबून आहे.
येत्या पन्नास वर्षांत भारत संपूर्ण विकसित राष्ट्र असेल. पण ते आपोआप घडणार नाही. त्यासाठी द्रष्टेपण, धोरणे, संधींचा लाभ घेण्याचा उत्स्फूर्त आत्मविश्वास, आवश्यक असतो. तसे दिसू लागल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून या अपेक्षांची पूर्तता कशी केरता येईल यावर मोदी सरकारचा भर आहे. एक दिवस असा येईल, तेव्हा या अपेक्षांची आम्ही नक्कीच पूर्तता केलेली असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.