– समाजवादी गणराज्य पक्षही केला विलीन
नवी दिल्ली – समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत झालेल्या या प्रवेशावेळी यावेळी काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते.
कपिल पाटील हे विधानपरिषदेचे आमदार होते. काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी समाजवादी गणराज्य पक्ष हा स्वतंत्र पक्ष काढला होता. हा पक्ष देखील कपिल पाटील यांनी काँग्रेस पक्षात विलीन केला. पाटील काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
प्रवेशावेळी कपिल पाटील म्हणाले, आज आम्ही काँग्रेस पक्षात समाजवादी गणराज्य पक्ष विलीन केला आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आम्ही बिनशर्त प्रवेश केला आहे. कोणतीही अट ठेवून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या निवासस्थानी माझा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे. आपल्याला फॅसिझम विरुद्ध लढायचे आहे. राहुल गांधी गेली अनेक वर्षे हुकूमशाही विरोधात लढत आहेत. आम्हीही या लढाईत त्यांना साथ देण्यासाठी आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आलो आहोत. फॅसिझम विरोधात लढायचे हीच अट आहे. देशात संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधींनी प्रदीर्घ लढा दिला आहे. जागावाटपावरून महाविकास आघाडीत वाद आहेत का? असे विचारले असता, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा संदर्भ दिला. तुटेल एवढे ताणायचे नसते. महाविकास आघाडी मजबूत आहे. लवकरच आघाडीचे जागावाटप होईल, असेही पाटील म्हणाले.